Saturday, 16 July 2011

लाही लाही ऊन ऊन

लाही लाही ऊन ऊन लाही लाही झळा
जगण्याच्या डोक्यातून मरणाच्या कळा

भट्टीतून वाहे जणू वारियाचा झोत
लाल ढग मुशितून सारे जीणे ओत
मातीतून आकारेल पोलादी पुतळा

मृगजळातून दूर बुडालेला गाव
नसलेल्या जळी चाले नसलेली नाव
नसलेली वाट जाते नसलेल्या स्थळा

खुरटल्या झुडूपाचे सुकलेले ओठ
चघळत काटे भरे बकरीचे पोट
खपाटल्या पोटातून भुकेचा सोहळा

नाही नाही ऊन ऊन नाही नाही झळा
काळ्या काळ्या कोकिळेचा पालावला गळा
हाक ओली पाठवली नभातल्या जळा

- संदीप खरे

No comments:

Post a Comment