Sunday 31 July 2011

देवा मला


देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर

कधी तरी कुठे तरी बसावी धडक
कळ मला यावे तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर

अपघाती सोन्ग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा दारू मधे कुठे असतो असर..

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा कुठे दुखते तुला
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभालाच्या पार
व्यथाचाच काय पडे जगाचा विसर


- संदीप खरे

अजुन तरी रुळ सोडुन


अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणुन नेम केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाची घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची
शोभा

- संदीप खरे

Friday 29 July 2011

कितीक् हळवे

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर

अवचीत कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते-लपते,
आणिक तरीहि इतूके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर

मेघ कधी हे भरुन येता,
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणि टप् टप् अन् इकडेही शाई झर् झर्

- संदीप खरे

आताशा मी फक्त

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठला ही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नाशी अवघ्या परवा करार मी केला
मी छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखूष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्र ही उरली पूर्वीगत हौशी
बिलन्दरीने कलन्दरीची गीते मी रचतो

कळू ना येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
बुडून जाती अत्तरापरि जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

- संदीप खरे

Thursday 28 July 2011

तुझ्या माझ्यासवे

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

- संदीप खरे

अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्यामधे
जेव्हा नेतिअस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता

- कुसुमाग्रज