Sunday 23 December 2012

कवी

कवीच्या कवितेत
चिमण्या चिवचिवतात
पण कवी स्वतःच्या घरात
चिमण्यांना खोपा करू देत नाही
तसा त्याचा फारसा विरोध नसतो
चिमण्यांच्या खोप्याला
होतं काय, खोप्यातून कचरा खाली पडतो
आणि कवीची बायको वैतागते

झाडावर कविता लिहिणारा कवी
झाडाची मुळं भिंत पोखरतात
म्हणून हिरवीगार झाडं तोडतो

कवी टाळतो पाहणं
स्वतःच्या पायाला पडलेल्या भेगांकडे
कवी दुर्लक्ष करतो
बायकोच्या रापलेल्या चेहर्‍याकडे
आणि गिरवत बसतो सखीचं चित्र
खूप हळूवार बरंच निरागस,
कधी कवी घासलेटाच्या रांगेत उभा असतो
मग त्याच्या शब्दांना येतो घासलेटाचा वास

शाळेतल्या वर्गात
कवीची कविता
उदात्त भावना वगैरे म्हणून शिकवली जाते,
दरम्यान कुठल्यातरी अनामिक स्टेशनवर
कवीचा छिन्नविछिन्न देह रूळावर सापडतो,
भक्कम चाकाची रेलगाडी आपल्या अजस्त्र पायांनी
तुडवून गेलेली असते कवीला,
पंचनाम्यात कवीच्या खिशात
किराणामालाची यादी

आणि रेलगाडीवरची
एक लोभस कविता सापडते.

- दासू वैद्य

Sunday 2 December 2012

भाज्या


गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची,
सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये,
शहल्या नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे,
हे भाजला जात आहे वंग, निथाल्त्या त्वचेतून पाणी, टप टप,
तड ताडल्या मोहोरी, हा खेळ चा फड फडात,
कडीपत्या च्या पंखांचा उकड्त्या तेलात,
आणि तिखट टाकला जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात,
धारेवर खिसली जात आहे गजर,
पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनलीये कोय,
वर्वान्त्या खाली चिरडली जाते आहे मीठ मिरची,
बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात,
फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून दह्याला फासावर चाडवला आहे चक्का बनवण्यासाठी,
हे भरडले जाताहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची,
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडा च्या पोटात,
पोलीस नुसतेच बघतायत,
संत्र्या मोसंबी केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत,
हे काय चाललायं, हे काय चाललायं….

- अशोक नायगांवकर

Saturday 1 December 2012

जीवन त्यांना कळले हो…


जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!

- बा. भ. बोरकर

Sunday 25 November 2012

मन चिंब पावसाळी


मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले

   - ना. धों. महानोर