Tuesday 10 July 2012

माझ्या गोव्याच्या भूमींत

 माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी
घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमींत
आंब्याफणसाची रास
फुलीं फळांचे पाझर
फळीं फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमींत
वनश्रीची कारागिरी
पानाफुलांची कुसर
पशुपक्ष्यांच्या किनारी

माझ्या गोव्याच्या भूमींत
उन्हाळ्यांत खारा वारा
पावसांत दारापुढें
सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमींत
येतें चांदणें माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमींत
चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन
भाव शब्दांवीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेनें
सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमींत
सागरांत खेळे चांदी
आतिथ्याची अगत्याची
साऱ्या षड्ःरसांची नांदी

माझ्या गोव्याच्या भूमींत
जिव्या सुपारीचा विडा
अग्निदिव्यांतुन हसे
पाचपोवळयांचा चुरा

माझ्या गोव्याच्या भूमींत
काळे काजळाचे डोळे
त्यांत सावित्रीची माया
जन्मजन्मांतरीं जळे

माझ्या गोव्याच्या भूमींत
लाल माती, निळें पाणी
खोल आरक्त घावांत
शुद्ध वेदनांची गाणीं

माझ्या गोव्याच्या भूमींत
खड्या जडावाची मूठ
वीर-शृंगाराच्या भाळीं
साजे वैराग्याची तीट

माझ्या गोव्याच्या भूमींत
उंच घूड देवळांचे
ताजमहाल भक्तीच्या
अश्रूंतल्या चांदण्याचे

माझ्या गोव्याच्या भूमींत
तृणीं सुमनांचे गेंद
सिद्ध कुणब्यांच्या तोंडीं
शुद्ध सौंदर्याचे वेद

माझ्या गोव्याच्या भूमींत
सुखाहुनी गोड व्यथा
रामायणाहुनी थोर
मूक उर्मिलेची कथा

माझ्या गोव्याच्या भूमींत
सारा माझा जीव जडे
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथें उलगडे.

- बाळकृष्ण भगवंत बोरकर

(१२-०७-१९५०)

Thursday 5 July 2012

नांगरणी


कणखर सकसता आणण्यासाठी
भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी
आडवे उभे घाव घालून घेणे  
आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे
म्हणजे नांगरणी

उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी
शेत-मळ‌‌‍‌‌‍‌‍यांवर हिरवीगार साय साकळावी;
अंग्या–खांद्यावरच्या गाई–गुरांना;
माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना,
चिमण्या–पाखरांच्या इवल्या चोचींना,
मूठमूठ-चिमूटचिमूट चाराचणा मिळावा;
म्हणून भूमीनं
स्वत:ची ओशिकपणे केलेली उरस्कोड
म्हणजे नांगरणी

इच्छा–आकां‍क्षांची पूर्तता करणारा पाऊस ‍
कृपावंत होऊन पडावा म्हणून
तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच
म्हणजे नांगरणी
 
हिरव्या चैत्यन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या
सर्जनोत्युक भूमीची घुसमटणारी   
निर्मितीपूर्व करुनावस्था
म्हणजे नांगराणी

- डॉ. आनंद यादव

Tuesday 3 July 2012

भल्या पहाटे निघून आले !

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेलीतुझ्याच स्वप्नात जाग आली
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

आताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले !

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !

- सुरेश भट

Monday 2 July 2012

|| पालखीचे अभंग ||

  
विटेवरी देवा | युगे झाली फार |
     सोडा पंढरपूर | जगासाठी ||

किती यावे-जावे  | तुझ्या दारापाशी |
    उपाशीतापाशी | आषाढीला ||

कितीक सांगावी ? दुष्टांची गाऱ्हाणी |
    सज्जनांकारणी | कोणी नाही ||

अमंगल सारे | पोसले जाताना |
    तुझा मुकेपना | जीवघेणा ||

नाही सोसवत | आम्हा हे पाहणे |
    सुकृताला जिणे | फासासाठी ||

सत्य-असत्याचे | तुझे निरुपण |
    ऐकताना शीण | आला देवा ||

आम्हा ठावे आहे | तुझे डोळेपण |
    राऊळ सोडोन | पाहा तरी ||

वैष्णवाचा धर्म | विश्वाकार थोर |
    सांगा दारोदार | पांडुरंगा ||

...विटेवरी देवा | युगे झाली फार |
    सोडा पंढरपूर | जगासाठी ||

--           -   ना.धों.महानोर