Wednesday 29 February 2012

पाऊल पडते अधांतरी !

उरात धडधड सुरात होते श्वास चुकवितो ताल परि
कशी सावरू तोल कळेना- पाऊल पडते अधांतरी !

कशी मोहिनी केली कोणी मलाच माझे ना कळते
मनात माझ्या फुलून अलगद फूल प्रीतिचे दरवळते
एक अनावर ओढ फुलविते गोड शिर्शिरी तनूवरी
कशी सावरू तोल कळेना- पाऊल पडते अधांतरी !

आठवणींच्या हिंदोळ्यावर होऊनि हळवे मी झुलते
कणाकणांतून इथल्या वेडा जीव गुंतला सोडवते
आनंदाचा घन पाझरतो गहिवर दाटून येई उरी
कशी सावरू तोल कळेना पाऊल पडते अधांतरी !

स्वप्न म्हणू की भास कळेना आज... मी बावरते
प्रीत जणू रेखीत तुझ्या मिठीत, मी मोहरते
हात दे रे हातात राहू दे साथ, जन्मांतरी.... जन्मांतरी !

 
-  गुरु ठाकूर

Saturday 18 February 2012

मनातल्या मनात मी

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

असेच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तु फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे तिपुन काढतो !

अजून तू अजाण ह्या,
कुवार कर्दळीपरी;
गडे विचार जणत्या
जुईस एकदा तरी ;
दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?”

तसा राहिला अता
उदास एकटेपणा;
तुझी रुपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !

- सुरेश भट

Friday 17 February 2012

काळ्या मोत्यांपरी

काळ्या मोत्यांपरी नेत्र हे ! ओठ माणकांपरी !
सुवर्ण ओतुन घडली काया ! कुंतल रेशीमसरी !

संगमर्मरी पोट नितळसे ! घट मोहाचे वक्षी !
अवघड वळणे घेवुन फिरली तारुण्याची नक्षी !!

वळणावळणावरी चोरटे नेत्र पाजळून जागे
आणि तनुवर मिरवित खजिना तुला फिरावे लागे

असे दागिने जडले बाई मोलाचे तव देही
जन्मभराची जोखीम झाली ! कुणा कल्पना नाही !!

-
संदीप खरे