Tuesday 19 February 2013

कुवत



"एकेकाचं आपल्या पत्नीवर किती जिवापाड प्रेम असतं." ती म्हणाली, " बघा ना. शहाजहाननं आपल्या मुमताजसाठी प्रेमाचं प्रतीक म्हणुन संगमरवरी ताजमहाल बांधला. नाही तर तुम्ही !"
"अग पण" तो म्हणाला, "शहाजहान बादशहा होता. त्याची बरोबरी मी कशी करणार ! पण मी नाही का आपल्या  स्वयंपाकघरात तुझ्यासाठी ओटा बांधला ? माझी कुवत तितकीच !"

- शांता शेळके 

Wednesday 6 February 2013

आठवणी


मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा 
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?

मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे 

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी

- पद्मा गोळे