Saturday 30 April 2011

मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

प्रेम

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यांमधले रक्त
ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात
चाकोरीला उध्वस्ताचे घण हवे असतात...

तसे काही चेहर्‍यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते !
ओठांत नाही हवी असते डोळ्यांत एक कथा
हवी असते षड्जासारखी सलग, शांत व्यथा...

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
वरुन खाली कोसळणारी मिंड हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती
प्रेम नाही, हवी असते मला चौथी मिती !...

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चाताप !....

- संदीप खरे 

सये आता सांग...



येण्याआधी वाट | आल्यावर सर |
आणि गेल्यावर | रिक्त मेघ |

इतके लाडके | असु नये कोणी |
डोळ्यांतून पाणी | येते मग ||

रातराणी बोल | 'परत कधी' चे |
उत्तर मिठीचे | संपू नये ||

सये आता सांग | सांग तुझे घर |
आहे वाटेवर | माझ्याच ना ||

- संदीप खरे 

कणा


ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

श्रावण मासी हर्ष मानसी


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे  

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनी येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते  

सुंदर परडी घेउनी हाती पुरोप कंठी शुद्धमती 
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती  

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला 
पारिजात हि बघता भामा रोष मनीचा मावळला 

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती  

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे 
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे 

देव दर्शन निघती ललना हर्ष माईना हृदयात 
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी 

झाडाखाली बसलेले


झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

सौमित्र

चुकली दिशा तरीही


चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .

मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .

चुकली दिशा तरीही आकश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे .

आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..

- विंदा करंदीकर

अशीच यावी वेळ एकदा

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचीत् काही तुझ्या समीप असताना
अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानाक
जवळ् नसावे चिट्ट्पाखरु केवळ् तुझी न् माझी जवळीक
संकोचाचे रेशीम पडदे हा हा म्हणता विरुन जावे
समय सरावा मंदगतीने अन प्रितेचे सुर जुळावे
मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तु हवेहवेसे असताना
शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले
मुक्तपणे तु उधळुन द्यावे जन्मभरीचे जपलेले….

- सौमित्र


जेव्हा मी


जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे, चार दिवस-
उर धपापेल, जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर
मला स्मरून कर,
हवे तर मला विस्मरून कर.

- नारायण सुर्वे

जालियनवाला बाग


रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
“प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !”
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

- कुसुमाग्रज

ओठ


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?

- सुरेश भट





अंदाज आरशाचा


अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...

काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...

ज़खमा कशा ? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...

माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या ? हा पिंजरा असावा...

- इलाही जमादार

जा जा जा दिले दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना..
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

 – संदीप खरे


Friday 29 April 2011

समजावुनी व्यथेला समजावता न आले


समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली … निघुन गेली…
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!

- सुरेश भट

जगत मी आलो असा की


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही !

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो ;
पण प्रकाशाला तरीही हाय , मी पटलोच नाही !

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही !

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही !

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही !

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ….
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

- सुरेश भट

बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
“ही कृपा ईश्वरी”- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
“छान धन्वंतरी बोलती !”

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

- सुरेश भट

आलाप


मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते ?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना…
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो ?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी ?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्या हवेत होते!

- सुरेश भट

संक्षेप


हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला

चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
“बाहेर एक कैदी तारा धरून गेला!”

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!

- सुरेश भट

चुकलेच माझे


मी कशाला जन्मलो? – चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! – चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! – चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! – चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो – चुकलेच

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! – चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! – चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! – चुकलेच माझे!

- सुरेश भट

मी नाही


जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!

- सुरेश भट

रिक्त


उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!

- सुरेश भट