Sunday, 26 April 2015

माऊली माऊली

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस गा लागली
जरी बाप सार्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे


विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा


दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हरपल देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस गा लागली
जरी बाप सार्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे


विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल


चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समीप हि दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारी विठ्ठल
श्री  ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

गुरु ठाकूर-    

Friday, 18 July 2014

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे

जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी

माधव ज्यूलियन

जीव दंगला

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल,
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढिंचा इटाळ,
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू

खुळं काळिज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखीन माझ्या जल्माचं गोंदण

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

- संजय कृष्णाजी पाटील


Friday, 23 May 2014

जुळून येती रेशीमगाठी..

मुक्याने बोलले.. गीत ते जाहले
स्वप्नं साकारले पहाटे पाहिले..
नाव नात्याला काय नवे ?

वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला.. आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ?
जुळून येती रेशीमगाठी..
आपुल्या रेशीमगाठी..

उन्हाचे चांदणे उंबर्‍यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले ?
खेळ हा कालचा.. आज कोण जिंकले ?
हरवले कवडसे.. मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे?

जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला.. मी तुजसाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ?
जुळून येती रेशीमगाठी..
आपुल्या रेशीमगाठी..


-        -  अश्विनी शेंडे

Monday, 24 March 2014

पाहिले न मी तुलापाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालांवर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपीत गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

मृदु शय्या टोचते स्वप्‍न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

-         - शांताराम नांदगावकर

प्रथम तुला वंदितो

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

विघ्‍नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमीर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया

सिद्धीविनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भवसिंधू तराया

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता
चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता
रिद्धीसिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया

-         -  शांताराम नांदगावकर

Monday, 22 July 2013

स्टेट

शासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने
आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला,
खंबीर भूमिका घेतली:
खोबरेल तेल ही स्वायत्त वस्तू असून
कलावंताला त्याच्या इच्छेप्रमाणे
कोणापुढेही न वाकता
डोक्यास तेल चोपडण्याचा
जन्मसिद्ध अधिकार आहे!

शासनही खंबीर होते, ठाम होते
त्याच्या दृष्टीने सामान्यांच्या हितासाठी
काही कटू निर्णय घ्यावेच लागतात
शेवटी प्रतिभावंताने देश सोडला,
सोडचिट्ठी दिली,
परकी नागरिकत्व स्वीकारले,
तेथे त्याने सुरुवातीला छळाच्या कहाण्या सांगितल्या

पापड मोडला म्हणून फाशी
भर रस्त्यात चिथावले म्हणून फाशी
कवितेचा कट केला म्हणून फाशी
आणखीन काय काय बांधवांच्या कणवेपोटी!
शेवटी त्यालाही लोक कंटाळले,
बेचव कहाण्यांना
त्यांना छळाच्या ताज्या कहाण्या हव्या होत्या
आणि तेही कंटाळला
स्वातंत्र्याला
मुक्ततेला
अनिर्बंधतेला
मातीला आपल्या हाडांची ओढ अटळ असते
हे त्यालाही आतून नाकारता आले नाही

आता त्याच्यापुढे
गहन प्रश्न उभा राहिला
धोतर नेसले तर हवेत उडते,
सैरभैर होते
घट्ट वस्त्र घातले
तर घुसमटते, जीव गुदमरतो

अशोक नायगावकर