Wednesday 14 March 2012

अंगणी माझ्या मनाच्या

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी !

चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी !

गार वारा मन भरारा शिर्शिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी !

-  चंद्रशेखर सानेकर

Sunday 11 March 2012

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश

रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास

दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

साऱ्या रंगावर आली एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास

- सुधीर मोघे