Thursday 23 June 2011

सांग सख़्या रे

सांग सख़्या रे आहे का ती अजुन तैशीच गर्द राईपरी
सांग सख़्या रे अजुन का डोळ्यातून तिचिया झुलते अंबर?
सांग अजुनही निजेभोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
सांग अजुनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी?

फ़ुले स्पर्शता येते का रे अजुन बोटामधूनी थरथर?
तिच्या स्वरानी होते का रे सांज अवेळी अजून कातर?
अजुनही ती घुमते का रे वेळुमधल्या धुन्द शीळेपरी?

वयास वळणावर नेणारा घाट तिचा तो अजुन का रे?
सलज्ज हिरव्या कवितेजैसा थाट तिचा तो अजुन का रे?
अजुन का ती जाळत जाते रान कोवळे जणु वणव्यापरी?

सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळुपरी
आणिक उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी
तिने ठेवला आहे का रे जपुन क्षण तो मोरपिसापरी

अता बोलणे आणि वागणे यातील फ़रकाइतुके अंतर
पडले तरिही जाणवते मज कवितेमधुनी तिचीच थरथर
सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी


- संदीप खरे

No comments:

Post a Comment