Saturday 18 June 2011

केव्हा तरी पहाटे


केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

- सुरेश भट

No comments:

Post a Comment