Saturday 4 June 2011

तू गेल्यावर

आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

- गुरु ठाकूर

No comments:

Post a Comment