Thursday 23 June 2011

लागते अनाम ओढ श्वासांना


लागते अनाम ओढ श्वासांना
येत असे उगाच ओठाना
होई का असे तुलाच स्मरताना.....
तनन धिमदा देरेना देरेना...तनन धिमदा देरेना देरेना

हसायचीस तुझ्या वस्त्रासारखीच फिकी फिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे
वेड्यासारखा बोलून जायचा माझा चेहरा

एकांती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना.....

संवादांचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता माझ्यापाशी मीच वाद
नको म्हणून गेलीस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला द्यावी दाद

मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना.....

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
शब्दच नव्हे मौन ही असते हजार अर्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून?

आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फ़िरताना.....

- संदीप खरे

No comments:

Post a Comment