Monday 16 May 2011

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल
सुंदर स्वप्ने पडत असतील, पण कुशीवर वळेल...उसासेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

तिच्यासमोरही तेच ढग...जे माझ्यासमोर
तिच्यासमोरही तेच धुके...जे माझ्यासमोर
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे,अन् पूर्णविरामही 
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र...एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात आहे माती आम्हा दोघांच्या...अजूनही 
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही 
कधी बोलीच वेगळी लावली...कधी फासेच वेगळे पडले
पण काळ्यापांढऱ्याचा एकच पट उलगडलाय मनात दोघांच्याही 
हजार मैल अंतरावरही एकच गाणे सुरू असेल
एकच लय भिनत असेल...एकाच क्षणी सम पडेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल...

- संदीप खरे

No comments:

Post a Comment