एक मोहिनी तनामनावर
तुझ्या भेटीची ओढ अनावर
शीळ वाजवी अवसळ वारा
फिरे तनुवर मोर पिसारा
नकळत स्मरतो स्पर्श तुझा अन
अंगांगावर उठे शहारा
सोसेना ही विरह वेदना
सख्या येऊन मजला सावर
तुझ्या भेटीची ओढ अनावर
एकांती मज येउन छळती
चोरपावली तुझ्या चाहुली
दर्पनातही बिंब दीसेना
होउन गेले तुझी सावली
मिटुनी डोळे स्वप्नी शिरता
प्रिया तिथेही तुझाच वावर
तुझ्या भेटीची ओढ अनावर
- गुरु ठाकूर
No comments:
Post a Comment