Tuesday 10 July 2012

माझ्या गोव्याच्या भूमींत

 माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी
घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमींत
आंब्याफणसाची रास
फुलीं फळांचे पाझर
फळीं फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमींत
वनश्रीची कारागिरी
पानाफुलांची कुसर
पशुपक्ष्यांच्या किनारी

माझ्या गोव्याच्या भूमींत
उन्हाळ्यांत खारा वारा
पावसांत दारापुढें
सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमींत
येतें चांदणें माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमींत
चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन
भाव शब्दांवीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेनें
सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमींत
सागरांत खेळे चांदी
आतिथ्याची अगत्याची
साऱ्या षड्ःरसांची नांदी

माझ्या गोव्याच्या भूमींत
जिव्या सुपारीचा विडा
अग्निदिव्यांतुन हसे
पाचपोवळयांचा चुरा

माझ्या गोव्याच्या भूमींत
काळे काजळाचे डोळे
त्यांत सावित्रीची माया
जन्मजन्मांतरीं जळे

माझ्या गोव्याच्या भूमींत
लाल माती, निळें पाणी
खोल आरक्त घावांत
शुद्ध वेदनांची गाणीं

माझ्या गोव्याच्या भूमींत
खड्या जडावाची मूठ
वीर-शृंगाराच्या भाळीं
साजे वैराग्याची तीट

माझ्या गोव्याच्या भूमींत
उंच घूड देवळांचे
ताजमहाल भक्तीच्या
अश्रूंतल्या चांदण्याचे

माझ्या गोव्याच्या भूमींत
तृणीं सुमनांचे गेंद
सिद्ध कुणब्यांच्या तोंडीं
शुद्ध सौंदर्याचे वेद

माझ्या गोव्याच्या भूमींत
सुखाहुनी गोड व्यथा
रामायणाहुनी थोर
मूक उर्मिलेची कथा

माझ्या गोव्याच्या भूमींत
सारा माझा जीव जडे
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथें उलगडे.

- बाळकृष्ण भगवंत बोरकर

(१२-०७-१९५०)

No comments:

Post a Comment