Thursday 5 July 2012

नांगरणी


कणखर सकसता आणण्यासाठी
भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी
आडवे उभे घाव घालून घेणे  
आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे
म्हणजे नांगरणी

उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी
शेत-मळ‌‌‍‌‌‍‌‍यांवर हिरवीगार साय साकळावी;
अंग्या–खांद्यावरच्या गाई–गुरांना;
माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना,
चिमण्या–पाखरांच्या इवल्या चोचींना,
मूठमूठ-चिमूटचिमूट चाराचणा मिळावा;
म्हणून भूमीनं
स्वत:ची ओशिकपणे केलेली उरस्कोड
म्हणजे नांगरणी

इच्छा–आकां‍क्षांची पूर्तता करणारा पाऊस ‍
कृपावंत होऊन पडावा म्हणून
तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच
म्हणजे नांगरणी
 
हिरव्या चैत्यन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या
सर्जनोत्युक भूमीची घुसमटणारी   
निर्मितीपूर्व करुनावस्था
म्हणजे नांगराणी

- डॉ. आनंद यादव

No comments:

Post a Comment