Friday 26 August 2011

फुटका पेला

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला....गोठ्यातच जगला हेला

अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला!

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला

ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे ?
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला ?

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-"माणूस कोणता मेला ?

जर हवे मद्य जगण्याचे....तर हवी धुंद जन्माची
तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला !

-  सुरेश भट

No comments:

Post a Comment