Friday 18 July 2014

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे

जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी

माधव ज्यूलियन

No comments:

Post a Comment