Tuesday 23 October 2012

फोटो

कुणीतरी विचारलं
मुलाखत घेताना
पहिल्याच प्रश्नात
कुठे बसून लिहिता तुम्ही ?
कुठेय स्टडी,
तुमची टेबल-खुर्ची ?
मला बघायचीय
जमलंच तर
तुमचा एखादा फोटोही...

हो, नक्कीच
काय काय बघायचं नेमकं ?
बघा, ही पृथ्वीची
विस्तीर्ण पाठ
तिच्यावर बसते मी
अश्शी मांड ठोकून
नि घेते लपेटून
‘स्व’च्या सळसळत्या
संवेदनेत
अवघी समष्टी

मी असे काही
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी
लिहिणारी मुक्ता सणकांडी
कधी थेरीगाथा लिहून
ज्ञा‌‍‍‌नाची असीम अनुभूती
साक्षात करणारी थेरी

माझा बाज नाहीये
निव्वळ शब्दजीवी

अनुभवाने गच्च भरलेल्या जगण्यात
मी मैलो न मैल चटचट चालणारी
नि अंगावरचे सगळे कपडे फेकून
भर रस्त्यात नागव्याने मोर्चा काढणारी

सोयरा आणि
जना
हिडींबा आणि
त्राटीका
शूर्पणखा  आणि
इरोम शर्मिला

अमिट आहेत चेहरे माझे
दगडासारखे
ठाशीव
नि लडिवाळपणाहूणही
असंख्य आहेत माझे विभ्रम
तुम्हाला नेमके कोणते हवे आहेत
तुमच्या फोटोसाठी?

    -     प्रज्ञा दया पवार

No comments:

Post a Comment