Thursday 27 September 2012

आठवण

फिका फिका पावसाळी प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडलाय
वाऱ्यावर उडणारी केसांची बट गालाला कुरवाळते
अशीच दिसली होतीस, पहिल्यांदा दिसलीस तेव्हा !
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

वाऱ्यात मिसळलाय सूक्ष्मसा मातीचा गंध
दोघांना खात्री आहे,
दूर कुठेतरी पाऊस पडून गेलाय...
दोघेही स्तब्ध झालो आहोत
सैलावलेल्या शरीराने
आवर्जून करण्यासारखं आता काही विशेष नाहीये
तुझ्या नकळत निरखतोय
मी तुझा चेहरा
जमिनीतल्या झऱ्यासारख्या त्यात कंटाळा झुळझुळतोय...
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

धरतीच्या उरावर जेव्हापासून बसलंय आभाळ
तेव्हापासून आपण ओळखतोय एकमेकांना...आपलं ठरलंच आहे !
सगळे ढग मातीत उरेस्तोवर
आपण खूप आठवणार आहोत एकमेकांना...
आता मोगऱ्याचा गजरा बिजरा न माळता
समोर बसलीस तरी काही हरकत नाही
इतकं अखंड, एकसंध नंतर काहीही आठवणार नाहीये....

बघ; तू-मी लावलेली वेल
तिच्या तिच्या झाडात कशी मग्न झाल्येय...
सगळ्याच हाका बंद झाल्याने
कसं भांबावायला झालंय तुला...
आणि मला
मला तर तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

-
संदीप खरे

No comments:

Post a Comment