Sunday 23 December 2012

कवी

कवीच्या कवितेत
चिमण्या चिवचिवतात
पण कवी स्वतःच्या घरात
चिमण्यांना खोपा करू देत नाही
तसा त्याचा फारसा विरोध नसतो
चिमण्यांच्या खोप्याला
होतं काय, खोप्यातून कचरा खाली पडतो
आणि कवीची बायको वैतागते

झाडावर कविता लिहिणारा कवी
झाडाची मुळं भिंत पोखरतात
म्हणून हिरवीगार झाडं तोडतो

कवी टाळतो पाहणं
स्वतःच्या पायाला पडलेल्या भेगांकडे
कवी दुर्लक्ष करतो
बायकोच्या रापलेल्या चेहर्‍याकडे
आणि गिरवत बसतो सखीचं चित्र
खूप हळूवार बरंच निरागस,
कधी कवी घासलेटाच्या रांगेत उभा असतो
मग त्याच्या शब्दांना येतो घासलेटाचा वास

शाळेतल्या वर्गात
कवीची कविता
उदात्त भावना वगैरे म्हणून शिकवली जाते,
दरम्यान कुठल्यातरी अनामिक स्टेशनवर
कवीचा छिन्नविछिन्न देह रूळावर सापडतो,
भक्कम चाकाची रेलगाडी आपल्या अजस्त्र पायांनी
तुडवून गेलेली असते कवीला,
पंचनाम्यात कवीच्या खिशात
किराणामालाची यादी

आणि रेलगाडीवरची
एक लोभस कविता सापडते.

- दासू वैद्य

No comments:

Post a Comment