Monday, 2 May 2011

तुझे नी माझे नाते काय ?

तु देणारी... मी घेणारा
तु घेणारी... मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय?....
तुझे नी माझे नाते काय?...

मला खात्री आहे तिला ही झोप आली नसेल
सुंदर स्वप्न पडत असतील
पण कुशीवर वळेल..उसासे घेईल
तिच्या समोर ही तेच ढग जे माझ्या समोर
तिच्या समोर ही तेच धुके जे माझ्या समोर
तिचे माझे स्वल्प विराम ही सारखे
अन् पूर्ण विराम ही
म्हणून तर मी असा आकंठ जागा असता
तिची ही पापणी पूर्ण मिटली नसेल
मला खात्री आहे तिला झोप आली नसेल

सुखदु:खाची होता वृष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येता टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
या मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?...

बगीचे लावले आहेत आम्ही एकत्र... एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात माती आहे आम्हा दोघांच्या...अजूनही
मनात फूल आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत !
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या भाषा आहेत !
रात्री होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन;
तेव्हा बेडच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी
तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...

नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्‍याचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?...

- संदीप खरे

तुटले


आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

- संदीप खरे




Sunday, 1 May 2011

पावसाला पापण्यांशी

पावसाला पापण्यांशी थोपवावे लागते
सर्व आहे ठीक ऐसे दाखावावे लागते

रोज माझी पाहतो मी प्राक्तने लाटांपरी
गाठण्याआधी किनारा ओसरावे लागते

हाय ! प्रेमातून सांगू काय व्हावे लागते ?
तीर व्हावे लागते अन् लक्ष्य व्हावे लागते!

अक्षरे ना ! शब्द नाही !समजते सारे तरी
पत्र ओल्या पापण्यांनी पाठवावे लागते

गौरकाया राधिकेला 'कृष्ण' व्हावे लागते
होत माती पावसाला साठवावे लागते

भेटही घेईन मी अन् शब्दही देईन मी
मुक्त आहे दार माझे, फक्त यावे लागते !

एवढा आलो पुढे की पाय ज्यांनी ओढले
कोण होते ते ही आता आठवावे लागते !!

रोज लाखो चेहऱ्यांनी येत गर्दी हिंडते
माणसाने माणसाला ओळखावे लागते !

- संदीप खरे

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

- आरती प्रभू

अजुन

रात्रीं झडलेल्या धारांची

ओल अजून हि अंधारावर
  
निजेंत अजुनी खांब विजेचा

भुरकी गुंगी अन तारांवर

भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या

वळचणींत मिणमिणे चांदणी

मळक्या कांचेवरी धुक्याच्या

वाऱ्याची उमटली पापणी

कौलावरुनी थेंब ओघळे

हळुच, सांचल्या पाण्यावरतीं;

थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो

गिरकी घेऊन टांचेवरतीं

गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच

गुरफटलेली अजुन स्तब्धता

कबूतराच्या पंखापरि अन

राखीकबरी ही अंधुकता

अजून आहे रात्र थोडिशी,

असेल अधिकहिकुणि सांगावें?

अर्धी जाग नि अर्धी निद्रा

इथेंच अल्गद असें तरावें!

- मंगेश पाडगांवकर