Saturday, 16 June 2012

निर्माल्य

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय
-
ती होता होता बायको ओरडते
-
मध्यरात्री कुत्री ओरडतात
-
पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
-
आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय
-
ती होता होता कविता आठवते
-
मध्यरात्री प्रेयसी आठवते
-
पहाटे पहाटे अंथरून ओलं करणारी धाकटी आठवते
-
अन उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय
-
ती होता होता मद्यात असते
-
मध्यरात्री गद्यात असते
-
पहाटे पहाटे पद्यात असते
-
अन उजाडता उजाडता पुन्हा एकदा सध्यातअसते

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय
-
ती होता होता कळी असते
-
मध्यरात्री फुलण्याची इच्छा असते
-
पहाटे पहाटे कळीच फूल असते
-
अन उजाडता उजाडता फक्त निर्माल्य असते

- संदीप खरे

Thursday, 14 June 2012

एवढे दे पांडुरंगा !

माझिया गीतात वेडे
दु: संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा !

- सुरेश भट

Wednesday, 13 June 2012

रंग चालला सोडून

रंग चालला सोडून अन पारा उडलेला
कितीक वर्ष आहे मी असाच पडलेला

अंतरातूनी रंगबावरे उडता वादळ
मजला त्यातील सफेद केवळ आवडलेला

मला लागती जन्मकळांचे रोजच वणवे
मीच त्यावरी कृष्णघनांसह गडगडलेला

चिमुटभर या दुःखाचे मज नाही ओझे
मी पृथ्वीचा भार साहुनी अवघडलेला

मी लाव्ह्याच्या सोबत आलो वाहून वरती
मी ना कोणा खणता खणता सापडलेला

- संदीप खरे