Thursday, 13 October 2011

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडलाबाप्पाजी बाहेर या
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

- कुसुमाग्रज

Wednesday, 12 October 2011

उपदेश

साऱ्याच शंकांची अशी मागू नको तू उत्तरे !
असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे !

वेड्या, शहाण्यासारखा तू खा शिळी ही भाकरी,
घाणेरड्या खोलीत ह्या शोधू नका आता घरे !

बोंबा अशा मारू नको ! त्यांना तुझी चिंता किती !
मागेच दुःखाची तुझ्या भरली तयांनी टेंडरे

तू मान वेदान्तापरी सारीच खोटी इंद्रिये,
पण जाण अपुले पोट तू ह्या इंद्रियामाजी खरे !

जमणारही नाही तुला त्यांची तिकोनी संस्कृती :
रे, बायकोमागे तुझ्या लेंढार पोरांचे फिरे ! रे,

संभावितांना तू कधी सांगू नको स्वप्ने तुझी :
चोरोनिया नेतील ते बाबा तुझी ही लक्तरे !

प्रस्थापितांचे बंड हे त्यांची प्रतिष्ठा वाढवी,
त्यांच्या तुताऱ्या वेगळ्याहाती तुझ्या पोंगा उरे !

- सुरेश भट

Tuesday, 11 October 2011

रंग माझा वेगळा !

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'
चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी माझा पेटण्याचा सोहळा

- सुरेश भट