Showing posts with label संदीप खरे. Show all posts
Showing posts with label संदीप खरे. Show all posts

Friday, 3 May 2013

शिवण


तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...

आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...

रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...

तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'
आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही!
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे 
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे!!

कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'
असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय?

तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय!
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...

-
संदीप खरे

Tuesday, 8 January 2013

पाऊस !

गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे

सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
हा कधी आला ? म्हणावे हसून
मागे रेलून...डोळे मिटून
मग आठवावी आपली एखादी गोष्ट
-
तर तिथेही...पाऊस !

-
संदीप खरे

Tuesday, 2 October 2012

मेंदूचा अभंग

काय आहे मेंदू ? | मेंदू विचारतो |
मेंदूच शोधतो | मेंदूला या ||

मेंदूतच आहे | दडले उत्तर |
नाही सापडत | मेंदूलाच ||

मेंदूलाच मेंदू | अनोळखी असा |
देहातून जसा | आत्माराम ||

संदूम्हणे मेंदू | पुरा वैतागला |
फुका शिणवला | जन्मभर ||

- संदीप खरे

Thursday, 27 September 2012

आठवण

फिका फिका पावसाळी प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडलाय
वाऱ्यावर उडणारी केसांची बट गालाला कुरवाळते
अशीच दिसली होतीस, पहिल्यांदा दिसलीस तेव्हा !
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

वाऱ्यात मिसळलाय सूक्ष्मसा मातीचा गंध
दोघांना खात्री आहे,
दूर कुठेतरी पाऊस पडून गेलाय...
दोघेही स्तब्ध झालो आहोत
सैलावलेल्या शरीराने
आवर्जून करण्यासारखं आता काही विशेष नाहीये
तुझ्या नकळत निरखतोय
मी तुझा चेहरा
जमिनीतल्या झऱ्यासारख्या त्यात कंटाळा झुळझुळतोय...
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

धरतीच्या उरावर जेव्हापासून बसलंय आभाळ
तेव्हापासून आपण ओळखतोय एकमेकांना...आपलं ठरलंच आहे !
सगळे ढग मातीत उरेस्तोवर
आपण खूप आठवणार आहोत एकमेकांना...
आता मोगऱ्याचा गजरा बिजरा न माळता
समोर बसलीस तरी काही हरकत नाही
इतकं अखंड, एकसंध नंतर काहीही आठवणार नाहीये....

बघ; तू-मी लावलेली वेल
तिच्या तिच्या झाडात कशी मग्न झाल्येय...
सगळ्याच हाका बंद झाल्याने
कसं भांबावायला झालंय तुला...
आणि मला
मला तर तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

-
संदीप खरे