Showing posts with label सौमित्र. Show all posts
Showing posts with label सौमित्र. Show all posts

Wednesday, 17 October 2012

अवंतिका

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांना तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

-         -  सौमित्र

Tuesday, 29 November 2011

तू कुठे आहेस गालिब

गालिब!
मला काहीतरी झालंय्...
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गालिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दु:खाइतकं मोठं व्हायचंय्...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पाहायचंय...
माझ्या जिवावर पडत चाल्लेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय्...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
"
खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई ना दे...'
तसा
तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बारमध्ये दारू पिताना
प्रत्येक वेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वत:
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोडून "व्वा' निघालीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय्
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...

मी तुला कधीचा शोधतोय्
तू कुठे आहेस गालिब?

 
- सौमित्र

Monday, 5 September 2011

आनंदाचा मंत्र

एक चोर नदी काठच्या घरात शिरला रात्री 
खूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री 
रित रिकाम घर सार फक्त कोरी पान 
काही वरती लिहिल्या होत्या कविता काही छान
एक कवी छोटा मोठा राहत होता तिकडे 
कविते सोबत जोडत होता आयुष्याचे तुकडे 
चोर बिचारा शोधून थकला काहीच नव्हत घरात
तितक्यात कवी येवुन उभा राहिला कुठूनतरी दारात 
हसून म्हटला, मित्र रित्या हाती जाऊ नकोस 
दुरून आला असशील तू निराश होऊ नकोस
जाण्याआधी सोबत आता माझे कपडेच घेऊन जा 
जाण्याआधी सोबत दोन घास खाऊन जा
असे म्हणून त्याने त्याला कपडेच दिले काढून 
समोर त्याच्या जाऊन बसला भाजी-भाकरी वाढून 
चोर चकित, कपडे घेऊन धुम्म गेला ळून 
अंधारातुनही पडताना पाहिलं नाही वळून 
कवी तसाच नागडा मग खिडकीत येऊन बसला 
कोजागिरीचा चंद्र पाहून मनात हसून म्हटला 
मला त्याला आनंदाचा मंत्र द्यायचा होता
माझ्या खिडकीमधला अख्खा चंद्र द्यायचा होता....

- सौमित्र