Sunday, 5 June 2011

तशात पाऊस !


कातरवेळी बसलो होतो आठवणींचा पिंजत पाऊस;
तशात पाऊस !

विस्कटलेले डाव पुराणे, ठुसठुसणारे घाव पुराणे
आणि पुराणे काही उखाणे: सुटता झालो उगाच भावुक;
तशात पाऊस !

कापसात त्या गवसून गेले बरेच काही गुरफटलेले
गर्भ रेषमी हळवे ओले: हवेहवेसे काही नाजुक;
तशात पाऊस !

आणि कुठुनसा आला वारा, घरभर कापूस झाला सारा
पसा-यात त्या गेलो हरवून: कसा, कधी अन्‌ कुणास ठावुक;
तशात पाऊस !

- गुरु ठाकूर

Saturday, 4 June 2011

तू गेल्यावर

आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

- गुरु ठाकूर

लागले मन परतीच्या वाटेवरती


लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती

वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भीजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

नकोस थांबू पैलतटावर पुन्हा मांडु ये डाव पटावर
पुन्हा सावरु जरी बहरले अडसर अवतीभवती
लागले मन परतीच्या वाटेवरती

चुकले कोठे कधी कुणाचे या सा-याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

- गुरु ठाकूर 

Friday, 3 June 2011

असेनही जरी

असेनही जरी मी सर्वांनी सोडलेला…!!!
असेनही जरी मी साम्प्रत्काली मोड्लेला…!!!
परुंतु इतुके निश्चित मजला ठाव की
मी इथला पण नक्षत्रांशी जोडलेला…!!!!



- संदिप खरे


हरकत नाही


अक्षर छान आलंय यात !”
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते
डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही
हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

- संदीप खरे

Thursday, 2 June 2011

अफाट होती तुझी स्मरणशक्ती



तुला नेमके ठाऊक होते, एकमेकांना पहिल्यांदा पाहीले
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन
एकमेकांच्या नजरेत हरवताना
आपण नक्की किती होतो एक का दोन ?
तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटने?
कुठल्याचा उसवला होता खिसा ?
रात्रभर गाणी म्हणून दाखवताना
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा ?
तुझ्याशी बोलताना चुकून जांभई निसटली
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ
आणि एकूण किती मायक्रो सेकन्द टिकू शकला होता ?
मुश्किलीने एकमेकांशी अबोला धरण्याचा खेळ
आठवते का तुला रातराणी शेजारी बसून
कविता म्हणून दाखवताना
फुललेल्या एकूण कळ्यांची संख्या
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या
नेमके आठवत होते तुला
कवितानी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणांवर
आणि मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही
कुठली कविता कुठल्या पानावर
अफाट होती तुझी स्मरणशक्ती
मलाच कसे काय विसरलीस कुणास ठाऊक ?



- संदीप खरे 

Wednesday, 1 June 2011

नको करू सखी


नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई ?
माझ्या मरणाची उगा उठेल आवई !

कशासाठी घालायचे काजळ डोळ्यांत ?
गर्द डोहावर राणी पसरेल रात!

कशास द्यायची अशी मुखाला लखाकी ?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटीत लपेटू नको काया धुंदफुंद !
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध !

नको करू सखी असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार !

संदीप खरे