Wednesday, 4 May 2011

हे भलते अवघड असते


गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला


हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….

- संदीप खरे

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

- संदीप खरे

नसतेस घरी तू जेव्हा


नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

 - संदीप खरे

Tuesday, 3 May 2011

प्रत्येकाची रात्र


प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेड़ी
प्रत्येकाच्या, पायामधे एक तरी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या, मनातून काहीतरी खोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनामधे स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या, प्रत्येकाची छाती करी रोज तडजोड़ी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

फिटावित जरातरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या, पानी कशी रोज खाडाखोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

- संदीप खरे

वेड लागलं


दिसलीस वार्‍यामध्ये आपुल्याच तोर्‍यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रणरण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वार्‍यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तर्‍हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं

- संदीप खरे

साहेब म्हणतो चेपेन चेपेन

साहेब म्हणतो चेपेन चेपेन,पोलीस म्हणतो चेपेन चेपेन
काळ मोठा वेळ खोटी, जन्मच म्हणतो चेपेन चेपेन

जगणे साले अचके देता नाकापाशी धरतो सूत
दचके खाऊन मेली स्वप्ने त्या स्वप्नाचे झाले भूत
भूत म्हणले झाडाला अस्तित्वांच्या फांद्याना
सुटका नाही दिवस रात्र घरात दारात भेटेल भेटेल

दिवस रोजचा थापा मारत दारावरती देतो थाप
दोरी दोरी म्हणता म्हणता त्या इच्छाचे झाले साप
धरता हाती डसती रे, सोडून देता पळती रे
अरे धरता हाती डसती रे, सोडून देता पळती रे
मन म्हणते पकडीन पकडीन हात म्हणतो सोडेन सोडेन

मी बुधाला मारुन डोळा, भरतो माझा पेलारे
प्याला तोही गेला जो ना प्याला तो ही गेलारे
या जगण्याला फुटता घाम झळकत जातो माझा जाम
अर्थ म्हणतो दारू दारू, शब्द म्हणतो शॅम्पेन शॅम्पेन

पानावरती कितीक मजकूर, शब्द नव्हे ती किटकिट रे
अरे या जगण्याचे झाले आहे पत्त्यावाचून पाकीट रे
हसलो मी जरी रडलो मी, इथेच येउनि पडलो मी
अरे हसलो मी जरी रडलो मी, इथेच येउनि पडलो मी
जन्म बोंबले सांगा सांगा, मृत्यू म्हणतो सांगेन सागेन

- संदीप खरे

Monday, 2 May 2011

जरी


मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव 'रोख' ठोक बनतो
जे ना माझे ते स्वनांशी उधार मागवतो !

कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी
पाऊस बघता ऊन्ह; उन्हातुन पाऊस आठवतो !

बंद पापणी बघून गेली स्वप्ने माघारी
तेव्हापासून डोळे उघडे ठेवुनिया निजतो !

कुणि भेटा रे खरेच होऊन वाळवंट सत्त्वे
रोज कितीदा मेघ मनातून माझ्या गडगडतो

आयुष्याच्या पायाशी जरि नम्रपणे बसतो
उलटून त्याचे पाय एकदा पाडावे म्हणतो !

- संदीप खरे