Friday, 29 April 2011

जगत मी आलो असा की


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही !

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो ;
पण प्रकाशाला तरीही हाय , मी पटलोच नाही !

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही !

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही !

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही !

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ….
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

- सुरेश भट

बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
“ही कृपा ईश्वरी”- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
“छान धन्वंतरी बोलती !”

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

- सुरेश भट

आलाप


मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते ?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना…
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो ?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी ?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्या हवेत होते!

- सुरेश भट

संक्षेप


हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला

चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
“बाहेर एक कैदी तारा धरून गेला!”

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!

- सुरेश भट

चुकलेच माझे


मी कशाला जन्मलो? – चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! – चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! – चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! – चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो – चुकलेच

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! – चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! – चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! – चुकलेच माझे!

- सुरेश भट

मी नाही


जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!

- सुरेश भट

रिक्त


उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!

- सुरेश भट