Monday 24 March 2014

पाहिले न मी तुला



पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालांवर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपीत गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

मृदु शय्या टोचते स्वप्‍न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

-         - शांताराम नांदगावकर

प्रथम तुला वंदितो

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

विघ्‍नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमीर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया

सिद्धीविनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भवसिंधू तराया

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता
चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता
रिद्धीसिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया

-         -  शांताराम नांदगावकर