Wednesday 27 March 2013

मरण…


अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा 
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी

- ग्रेस

Saturday 9 March 2013

भुई भेगाळली खोल


भुई भेगाळली खोल, वल्लं र्‍हाईली न कुटं 
पाल्या-पाचोळयाचा जीव वहाटुईशी घुस्‍मटं

उभ्या दस्कटाचं रान आयुष्याला भिंगुळवानं
मुक्या जात्याच्या बाळूशी ओवी गाते जीवातून

सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट
दाट दु:खाचं गाठुडं, शब्द उचलंना वटं

माय सुगरनी बाई, देई घरट्याशी थारा
असं बेवारशी जीनं सोसवेना उन्हं-वारा

-          - ना.धों.महानोर

Friday 8 March 2013

एकदा


एकदा पहिल्या पन्नासातच
पन्नास हजार विद्यार्थी आले
मग तपासाणारे म्हणाले
आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
असे मार्क देउ या !


नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
शहरात राहू लागले
आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
खेड्यात गहू पिकतो
शहरात व्हावचरे पिकतात
कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
एके दिवशी मोठ्ठा  पाऊस आला
सगळे कागद ओले झाले
पण कागदांना मोड आले नाहीत

शेवटी गणोबाने परवा
रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
१) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
२) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?


- अशोक नायगांवकर

Thursday 7 March 2013

ओल्या सांजवेळी


ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

- अश्विनी शेंडे

Wednesday 6 March 2013

लेणी



समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


- पद्मा गोळे