Sunday 25 November 2012

मन चिंब पावसाळी


मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले

   - ना. धों. महानोर

Saturday 17 November 2012

पाणवठ्यावरच्या बायकांप्रमाणे...

प्रत्येक कविता लिहीताना
मला वाटतं
कुठल्यातरी देशात
कुठल्यातरी भाषेत
नक्कीच अशी कविता लिहून झाली असेल,
मग मी नवीन असं काय लिहीणार
तरीही स्वत:ची आदळ आपट करीत
शाळकरी पोरासारखे शब्द गिरवत राहतो,
खोप्याबाहेर तोंड काढून बघणारया
पिलासारखी एक आशा असते,
कधी ना कधी
या सारख्या चेहरयाच्या कविता
एखाद्या कविसंमेलनात
अचानक एकमेकींना भेटतील,
ओळखीचं हसतील,
कविता वाचन संपल्यावर कवीलोक
मानधनाचं पाकीट सांभाळत
फ़ेसाळलेल्या ग्लासासमोर खिदळताना,
या सगळ्या सोशिक कविता
बाहेरच्या पायरयांवर बसून
एकमेकींचे हात हातात घेऊन
सुख-दु:खाचं बोलतील
पाणवठ्यावरच्या बायकांप्रमाणे...

- दासू वैद्य

Wednesday 7 November 2012

रानभूल...



मन उमजत नाही
खोल पाणी डोहात
लपलेले काही आत ज्ञात अज्ञात
ते शोधू जाता अडखडते पाऊल
या कातरवेडी पडते रानभूल...

घनदाट धुक्यातून हरवून गेली वाट
घनगर्द सभोवती जंगल हे सन्नाट
पावलो-पावली जाणवते चाहूल
या कातरवेडी पडते रानभूल...

हा एक मसीहा घुसमटत्या अंधारी
छेडीतो अनामिक भय कंपाच्या लहरी
भवताली धुरकट भग्न गुढ झाकोळ
तिमिराच्या पहरी पडते रानभूल...

- श्रीरंग गोडबोले

Sunday 4 November 2012

क्षणभर विश्रांती


क्षणभर विश्रांती या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती...

दूरची वाट अन स्वप्नातली दूर गावे
जायचे नेमके कोठे कुणाला न ठावे
थांबती, संपती जुळती नव्या रोज वाटा
सूर त्यांच्यासवे या जीवनाचे जुळावे
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती...

आवरावे जरा बेभानल्या पावलांना
सावरावे जरा स्वप्नाळल्या लोचनांना
गीत ओठी नवे घेवूनी या जीवनाचे
गुंतवावे जरा भांबावलेल्या मनाला
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती..


- गुरु ठाकूर