Tuesday 23 October 2012

फोटो

कुणीतरी विचारलं
मुलाखत घेताना
पहिल्याच प्रश्नात
कुठे बसून लिहिता तुम्ही ?
कुठेय स्टडी,
तुमची टेबल-खुर्ची ?
मला बघायचीय
जमलंच तर
तुमचा एखादा फोटोही...

हो, नक्कीच
काय काय बघायचं नेमकं ?
बघा, ही पृथ्वीची
विस्तीर्ण पाठ
तिच्यावर बसते मी
अश्शी मांड ठोकून
नि घेते लपेटून
‘स्व’च्या सळसळत्या
संवेदनेत
अवघी समष्टी

मी असे काही
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी
लिहिणारी मुक्ता सणकांडी
कधी थेरीगाथा लिहून
ज्ञा‌‍‍‌नाची असीम अनुभूती
साक्षात करणारी थेरी

माझा बाज नाहीये
निव्वळ शब्दजीवी

अनुभवाने गच्च भरलेल्या जगण्यात
मी मैलो न मैल चटचट चालणारी
नि अंगावरचे सगळे कपडे फेकून
भर रस्त्यात नागव्याने मोर्चा काढणारी

सोयरा आणि
जना
हिडींबा आणि
त्राटीका
शूर्पणखा  आणि
इरोम शर्मिला

अमिट आहेत चेहरे माझे
दगडासारखे
ठाशीव
नि लडिवाळपणाहूणही
असंख्य आहेत माझे विभ्रम
तुम्हाला नेमके कोणते हवे आहेत
तुमच्या फोटोसाठी?

    -     प्रज्ञा दया पवार

Wednesday 17 October 2012

अवंतिका

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांना तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

-         -  सौमित्र

Sunday 7 October 2012

मी म्हणालो बायकोला

मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू

मी किनार्‍याचा तिला पत्ता दिला
ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या
ती म्हणाली, दूध हे जाते उतू

ती म्हणाली आठवा वर्षे जुनी
मी म्हणालो, काळ सारा गोठला

रूम मित्राने दिली एकांत रात्री
ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घराला
ती म्हणाली, कोणती भाजी डब्याला ?

- अशोक नायगांवकर

Tuesday 2 October 2012

मेंदूचा अभंग

काय आहे मेंदू ? | मेंदू विचारतो |
मेंदूच शोधतो | मेंदूला या ||

मेंदूतच आहे | दडले उत्तर |
नाही सापडत | मेंदूलाच ||

मेंदूलाच मेंदू | अनोळखी असा |
देहातून जसा | आत्माराम ||

संदूम्हणे मेंदू | पुरा वैतागला |
फुका शिणवला | जन्मभर ||

- संदीप खरे