Thursday 27 September 2012

आठवण

फिका फिका पावसाळी प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडलाय
वाऱ्यावर उडणारी केसांची बट गालाला कुरवाळते
अशीच दिसली होतीस, पहिल्यांदा दिसलीस तेव्हा !
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

वाऱ्यात मिसळलाय सूक्ष्मसा मातीचा गंध
दोघांना खात्री आहे,
दूर कुठेतरी पाऊस पडून गेलाय...
दोघेही स्तब्ध झालो आहोत
सैलावलेल्या शरीराने
आवर्जून करण्यासारखं आता काही विशेष नाहीये
तुझ्या नकळत निरखतोय
मी तुझा चेहरा
जमिनीतल्या झऱ्यासारख्या त्यात कंटाळा झुळझुळतोय...
तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

धरतीच्या उरावर जेव्हापासून बसलंय आभाळ
तेव्हापासून आपण ओळखतोय एकमेकांना...आपलं ठरलंच आहे !
सगळे ढग मातीत उरेस्तोवर
आपण खूप आठवणार आहोत एकमेकांना...
आता मोगऱ्याचा गजरा बिजरा न माळता
समोर बसलीस तरी काही हरकत नाही
इतकं अखंड, एकसंध नंतर काहीही आठवणार नाहीये....

बघ; तू-मी लावलेली वेल
तिच्या तिच्या झाडात कशी मग्न झाल्येय...
सगळ्याच हाका बंद झाल्याने
कसं भांबावायला झालंय तुला...
आणि मला
मला तर तू समोर असूनही तुझी खूप आठवण येतेय ...

-
संदीप खरे

Sunday 16 September 2012

अरे मनमोहना

अरे मनमोहना,
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही

सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही

-  जगदीश खेबूडकर

Friday 7 September 2012

जाईजुईचा गंध मातीला

आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावुन येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जीण्याला
मेघुटांच्या पालखीला, डोळे गेले आभाळाला

जाईजुईचा गंध मातीला
हिरव्या झाडांचा छंद गीताला

पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला

रूपदेखणी झाडीत कुणी
सर्व्या रानाचा जीव पांगला

आंबेराईत, डोळे मोडीत
कुणी डोळ्यांचा झुला बांधला

- ना. धों. महानोर