Friday 20 April 2012

झंझावात

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी
 
झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे !
जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी

माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा
मीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी

कुठल्याच दारी मी कधी नेली कागाळी तुझी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी ?

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !

मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका
-
धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी !

माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी
उमटेल मी धरतीवरी ….. चमकेन त्या गगनात मी !

- सुरेश भट

Saturday 7 April 2012

लिलाव

उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
आणि ही रे !पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार

- कुसुमाग्रज

Friday 6 April 2012

जीव राखता राखता

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

- ग्रेस

Thursday 5 April 2012

ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी...

ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी...

जेव्हा लगडून येतील फुलं याच्यावरती
अन आयुष्याची रेषा होईल हिरवीगार
तेव्हा मी नसेन कदाचीत पण जाणवेल तुला
हा माझाच गंध आहे हा आहे माझाच बहार...

मातीपाण्यावाचूनही राहील ती डहाळी
ती लागली आहे कुण्या काळी माझ्या आत
डोळ्यांना दिसणाऱ्या पावसाची गरज नाही तिला
तिची सारी हयात गेलीय रणरणत्या उन्हात

अगदी राजवर्खी फुलांची नव्हेच ती डहाळी
पण इतकी साधीही नव्हे की फुलंच येणार नाहीत
प्रत्येक गोष्टीची चिमणे यावी लागते वेळ
तीच तेवढी नव्हती बघ या जन्माच्या हद्दीत

सारा जन्म गेला बापाचा ढगांच्या सावल्या मोजण्यात
कुणीही विचारलं तरी बेलाशक सांग
असे निरूद्योगही करावे लागतात कुणीतरी
कधीतरी सोडावीच लागते मेंढरांची रांग

बहरलेलीच द्यायची होती ही डहाळी तुला
माहीत नव्हते आशेपेक्षा श्वास छोटे पडतील
हरकत नाही हेही बरेच! तुला तरी आता
दोन्ही ऋतू निट निरखून पारखून घेता येतील

झोपून घे थोडी अजून उजाडायला वेळ आहे
उद्या चिमणे आहेच तुला तुझा तुझा प्रवास
तुला तरी दिसोत फुलं या डहाळीच्या हक्काची
या शब्दांहून काही नाही जवळ तेव्हा तूर्तास

...
ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी

-
संदीप खरे