Sunday 25 December 2011

आज मी आयुष्य माझे

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-
संदीप खरे

Sunday 11 December 2011

किती ?- एक जनरल छापील फॉर्म

तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस

तो/ती खपून आता वर्ष होईल अवघं दीड
पण अजूनही आवडतंच त्याला/तिला
वाडीलालचं चॉकलेट आईस्क्रीम,
ब्राऊन शेडेड शर्ट/साड्या,
सनसेट, भीमसेन, पिकासो, परफ्युम्स...
आणिक हो !
आताशा ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस कलीगची कंपनीही
एक कप कॉफीसाठी ?
तो’/’तीअसली म्हणजे मन थोडं हलकं होतं...यू नोऽऽ

तो’/’तीआवडतो/ते
तो’/’तीखूप आवडतो/ते
तो’/’तीचिकार आवडतो/ते
...
तुझ्यावाचून जगणे नाही...
...
श्वास घेणं शक्य नाही...
...
तू नसशील तर नसेन मी ही...
.................
वगैरे.....

-
संदीप खरे

Wednesday 7 December 2011

रोज

गात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!

सुरेश भट

Tuesday 6 December 2011

वणवण

रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुलायेम्हणत राहिलो!

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो!

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो!

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज ताराच तो गवसला नेमका..
अंबरापार मी वणवणत राहिलो!

सुरेश भट