Saturday 29 October 2011

पाहिले वळून मला

कळे काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला

तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला

पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?
उगीच लोक खुळे पाहती जळून मला

खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये आढळून मला?

जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला

उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?
करी अजून खुणा चंद्र मावळून मला

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

- सुरेश भट


Thursday 27 October 2011

सारे तिचेच होते

सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी
हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी
आम्हीही त्यात होतोखोटे कशास बोला
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

- विंदा करंदीकर

Friday 21 October 2011

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा

- आरती प्रभू

Thursday 20 October 2011

नाही कशी म्हणू तुला

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

- आरती प्रभू

Wednesday 19 October 2011

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचेशेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.

- इंदिरा संत