Wednesday 28 September 2011

एल्गार

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु: राजवर्खी .. ते दु: मोरपंखी..
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी ?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही

उचारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

- सुरेश भट

Sunday 25 September 2011

आसवांचे जरी हसे झाले

आसवांचे जरी हसे झाले!
हे तुला पाहिजे तसे झाले!!

चंद्र आला निघुनही गेला!
ऐनवेळी असे कसे झाले!!

शोधुनी मी तुला कुठे शोधु!
चेहऱ्याचेच आरसे झाले!!

पाहिले दुःख मी तुझे जेव्हा!
दुःख माझे लहानसे झाले!!

आग ओकून मी किती ओकू!
शब्द सारेच कोळसे झाले!!

संपले हाय बोलणे माझे!
जे तुझ्याशी कसेबसे झाले!!

- सुरेश भट

Saturday 24 September 2011

भिजून गेला वारा

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू, ये ना जरा चाहूल हलके दे ना जरा 
ये ना जरा तू, ये ना जरा चाहूल हलके दे ना

झिम्माड पाऊस, तू नको जाऊस
चुकारं ओठ हे बोले 
श्वाशात थरथर, सरीवरी सर
मन हे आतूर झाले 
ये ना जरा तू, ये ना जरा  मिठीत हलके घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा  मिठीत हलके घे ना

स्पर्शात वारे, निळे पिसारे 
आभाळ वाहून गेले 
तुझ्यात मी अन माझ्यात तू 
कसे दोघात जग हे न्हाले 
ये ना जरा तू, ये ना जरा मिटून डोळे  घे ना जरा 
ये ना जरा तू, ये ना जरा मिटून डोळे  घे ना

- अश्विनी शेंडे

Thursday 22 September 2011

आम्ही…

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही

तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही

दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही

जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

- सुरेश भट