Tuesday 31 May 2011

पारिजात

फुल कोवळे शुभ्र से बोलके अबोलसे
कुण्या अंगणी झाड कुण्या दारी बहर 
नाते ओंजळीत गेले सुकुन फार 
तरी दाराची फुले देती गंध त्यास 
वेचावे वेचावे चांदणे हातात 
करतो वेडी माया कुठला पारिजात 

- अश्विनी शेंडे 

ओळख


पापन्यांच्या पलीकडे आहे एक गाव 
आभाळात कोरलेले दोघींचे नाव 
दोघींच्या नावाचा बघ आहे तारा
आम्ही सांगु त्या दिशी वाहणारा वारा
जगुया ना थोडीशी स्वप्ने स्वत:ची 
घडवूया एक नवी ओळख स्वत:ची 

- अश्विनी शेंडे 

लख लख चंदेरी


लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरिले
अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे सोळा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली घडली ऐसी किमया

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगूळा
बघता बघता व्यापून जातो देहभान अमुचे सगळा
रडणा-याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वाथाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे

- श्रीरंग गोडबोले 

Monday 30 May 2011

सरीवर सर..


दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडातडा गारगार गरागरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना ओले ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
सरीवर सर..

- संदीप खरे

Sunday 29 May 2011

कसे सरतील सये


कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

- संदीप खरे

तुम्ही म्हणाल तसं


माझ बोलणं, माझ चालणं, माझ हसणं, माझ वागणं
ऊन सावलीच्या परि कधी नकोस हवंसं
तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं
हा हा तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं

कधी वाटते म्हणावे गीत केवळ आजचे
आणि डोळ्यांच्या तळ्यात दीप सोडावे कालचे
कुणी वाहती तळ्यात, कुणी हळव्या डोळ्यात
दोन्ही कासावीस,हो हो दोन्ही कासावीस
ह्म ह्म तुम्ही म्हणाल तसं,हो तुम्ही म्हणाल तसं

दिसभर आसावलो एका कवडशासाठी
सांज ढळता ढळता ऊन पोचल दाराशी
आता सावलीच्या ओठी येड्या उन्हाची बासरी
गाणं येडपीस, हो हो गाणं येडपीस
हो हो तुम्ही म्हणाल तसं,हो हो तुम्ही म्हणाल तसं

पैलतीर गाठताना आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला पैलतीर ऐलतीर्
जीव कोणत्या काठचा कुन्या नाहीश्या गावचा
आता म्हणाल तसं, हो हो आता म्हणाल तसं
हो हो तुम्ही म्हणाल तसं,हा हा तुम्ही म्हणाल तसं

-  संदीप खरे 

Saturday 28 May 2011

ही गुलाबी हवा


ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
हाय्‌ श्वासातही ऐकु ये मारवा

तार छेडी कुणी रोमरोमातुनी
गीत झंकारले आज माझ्या मनी
सांज वा-यातही गंध दाटे नवा

का कुणी रंग हे उधळले अंबरी
भान हरपून मी कावरी बावरी
का कळेना तरी बोलतो पारवा

- गुरु ठाकूर

निषेध


आम्ही कधीच पेटून उठत नाही
आम्हाला कुणीतरी चिथवावं लागतं.
आमच्यातल्या विवेकाला
धर्माचं नाहीतर अस्मितेचं
गाजर दाखवून फितवावं लागतं.
मग कुठेतरी
आतून भ्याड आणि बुळे असणारे आम्ही पेटुन उठतो.
अन्‌ स्वत:च्या षंढत्वाबद्दल वाटणा-या घृणेला
कुठल्यातरी निषेधाचं लेबल लावून
मिळेल ते जाळत सुटतो.
कुठला धर्म ? कुठल्या भावना?
कुठली अस्मिता ? कुठल्या विटंबना
आम्हाला नसतो विधीनिषेध
आम्ही फक्त नोंदवत असतो
आमच्या लाचार कृतीशून्यते विरुद्धचा आमचा निषेध !!

- गुरु ठाकूर

हे राजे


हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी आम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

तलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग
जगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग
जगण्या सिद्धांत आज हा, शक्ती दे शतपटी आम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

- गुरु ठाकूर

नवरी आली


गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

नव-या मुलाची आली हळद ही ऒली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ऒढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासराला
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... गं पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

- गुरु ठाकूर

Friday 27 May 2011

पुन्हा दिनरात


कळले नाही कधी उसवले लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्या आधी पतंग स्वप्नांचे
नशिबी आली फरपट माझ्या कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

चुकली सारी गणिते केवळ शून्य उरे हाती
उडूनी गेली वर्षे झाली जन्माची माती
पसार झाली नाती सारी सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

जाती भावना जळूनी जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो या जगण्याचा अन नियती भेसुर हसते
चुकले कोठे कळण्या आधी होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

- गुरु ठाकूर

अप्सरा आली


कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजली रुप्यात भिजली रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी ऊमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बीजली पाहुन थीजली ईंद्रसभा भवताली

अप्सरा आली ईंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छ्बीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार
ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वा-याची

ही नटली थटली जशी ऊमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बीजली पाहुन थिजली ईंद्रसभा भवताली

अप्सरा आली ईंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

- गुरु ठाकूर 

कशी मी जाउ मथुरेच्या बाजारी ?


दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले गं जाऊ कशी चोरुन बाई
मथुरेच्या बाजारी ... कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

नटखट भारी किसनमुरारी टपला यमुना तीरी
करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी ... कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ?

नकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी
हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले
देवा शरण तुला मी आले

वाट अडवुन हसतो गाली ग वेणू ऐकुन मोहित झाले
भान हरपुन रमती गोपीका, शाम रंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा कान्हा झुलवी असा हा नटनागर गिरीधारी
त्याच्या संग दंगले रास रंगले, पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाउ मथुरेच्या बाजारी ?

- गुरु ठाकूर 

Thursday 26 May 2011

नटरंग ऊभा


धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट परवत ऊभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पख्वाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुन्याई लागु दे आज पनाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर ऊपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा सौसार आता घरदार तुझा दरबार
चेतला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी

- गुरु ठाकूर 

खेळ मांडला


तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो ऊरी पेटला .... खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू -हा हुबा
ह्यो तुझ्याच ऊंब-यात खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीनं; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे
ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शीवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला

- गुरु ठाकूर

आता वाजले कि बारा


चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
याचा न्हाई भरवसा तोल -हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता , दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंब-यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची
नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची
शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला -हाईना ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना
नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना
मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही -हाऊ द्या ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

- गुरु ठाकूर 

Wednesday 25 May 2011

सांग ना रे मना

अंतरी वाजती प्रितीची पैंजणे, आणि धुंदावती भाबडी लोचने,
होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना सांग ना रे मना

श्वास गंधाळती, शब्द भांबावती, रोम रोमातली कंपने बोलती,
मोहरे मोहरे पाकळी पाकळी, भारलेल्या जिवा आवरावे किती,
का अश्या जागल्या सांग संवेदना, सांग ना रे मना

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली, ऐकू ये कोठुनी साद ही मलमली,
गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली, हे शहारे जणु रेशमाच्या झुली,
आज ओथंबल्या का अश्या भावना, सांग ना रे मना

-गुरु ठाकूर

पाठ

सोडतांना प्राण त्‍यांना मी कुठे बोलावले ?
खातरी झाली न त्‍यांची .. ते घरी डोकावले !

हा कसा झिम्‍मा विजांशी ओठ माझे खेळती
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्‍हावले ?

ऐकली आजन्‍म त्‍यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!

मी न स्‍वप्‍नांचे कधीही मान्‍य केले मागणे
दु:ख माझे एकट्याचे मी कधी लाडावले ?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणा-यांचेच डोळे शेवटी पाणावले !

वेचण्‍या जेव्‍हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्‍द सारे धावले !

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले !

- सुरेश भट

शुभम करोति

जीवनाचे मी आनंद गाणे
ताल सूर सारे जुळल्याप्रमाणे
मी प्रकाशाशी जोडून नाते
स्नेह बंधाच्या उजळीत ज्योती
काळोख सर्व प्राशून घेते
अन पहाटेची मी प्रभा होते
सांज वेळी तेवणारी
चंद्र शीतल दीप ज्योती
शुभम करोति

-  सौमित्र 

मी गातो एक गाणे


मी गातो एक गाणे
पान वाजवते टाळी
त्याच्या धिटाईने एक
लाज लाजलेली कळी

रात लाजुनिया गेली
दिले पहाट बहाने
पाना पानात ठेवले
तिने दवाचे उखाणे

आळसावल्या नदीची
अशी मोहक वळणे
वेड लावित नभाला
तिचे स्वत:त नहाने

कुणी नाही जरी येथे
कशी वाजती पैंजणे
अशी चांदण चाहूल
कुन्या पावलांचे देणे

रान भर चंद्र चंद्र
त्याचे गात गात गाणे
रात भर शिळेवर
कुणी पाखरू दिवाणे

तुझ्या डोळ्यातल्या रानी
असे रानभर होणे
अशा वनात कबूल
आम्हा वनवासी होणे

- संदीप खरे

मन होई मेघवेड


मन होई मेघवेड ओल्याराती
मेघ गाई मेघधून कोणासाठी

दिस रुसून गेला सामसूम
रात धरी बोट ये म्हणून
नभी मेघ पाणी डोळा देत जाती

आई दे ग कुशी हळूवार
गाई तेच गाणे एकवार
घाव दुनियेने दिलेले खोल जाती

उद्या उजाडेल पुन्हा ठाव
नाव तेच तेच पुन्हा गाव
या जगाची रीत ठावी तीच कोती

- संदीप खरे

घेत निरोप नभाचा


घेत निरोप नभाचा
बघ निघाला दिवस
थोडे ठेऊन घेऊन
थोडे निघाला दिवस

तसे मुख मावळतीचे
उदास उदास
तसा गार वारा वाहे
जसा खोल श्वास
दूरच्या दिव्यांना देत
निघाला दिवस

विझवुनी दिवसाचा दीप
पेटवून रात
पडे देह अवनीचा या
तमाच्या कुशीत
थोडा अधीरसा श्वास
थोडा दिलासा दिवस

आता गाऊ द्यावे गाणे
जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने
पहाटे पहाटे
गाव मन नाव ज्याचे
त्याची ढासळते वेस

- संदीप खरे

रात्र सुंदर, चंद्र सुंदर


रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर

हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी
रात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी
हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर
चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर
या तुझ्या अनिवार सयीचे जीवघेणे सत्र सुंदर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे
निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे
रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

- संदीप खरे

येईन स्वप्नात


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेडं उत्तर देशील का मला
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतीचा चंद्र नवतीचा करशील का मला
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांगू बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशील का जरा
कोणी नसताना काही कळताना येशील का जरा
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला

- संदीप खरे

Monday 23 May 2011

विश्वारंभापासून येथे


विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे...
आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे

अग्निच्या ज्वाळांतुन फूलते लवलव लपलप गाणे
वेळूच्या वार्‍यातुन झुलते मंजुळ मुरली गाणे
पाण्यामधुनी वाहात असते अवखळ खळखळ गाणे
वीज नभाची गाउन जाते कडाड कडकड गाणे
महाभुतांच्या ह्रुदयांतरीही अमीट असते गाणे,
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे

हसण्याचेही होते गाणे, फसण्याचेही गाणे
असण्याचेही असते गाणे, नसण्याचेही गाणे
आनंदाचे खजिने आंदण अन दुखा:ला देते कोंदण,
सदैव रुंजी घालत आहे मनीमानसी गाणे

आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे

- संदीप खरे

चला रे माझ्या

चला रे माझ्या थकल्या पायांनो
हला रे माझ्या हरल्या हातांनो
दमायचे नाही बसायचे नाही
प्राक्तनावरती रुसायचे नाही

काहीही सूचू दे काही ना सूचू दे
अंतरी चंदन पेटते असु दे
कापरासारखे जळायचे नाही
काही न ठेवता विझायचे नाही

जपत जपत नभाची थोरवी
करायची आहे माती ही हिरवी
जो वरी सुचते पावसाचे गाणे
हिरमुसवाणे व्हावयाचे नाही

तळाशी फुटकी भरत कळशी
जपायची उरी युगांची असोशी
एका गावी फार थांबायाचे नाही
धाकटया गर्दीत रमायचे नाही

- संदीप खरे

बरं झालं


या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो.
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन . . .
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
फांदीफांदीलाच मीच असेन . . .
पानापानांतून, देठादेठावर,
येणारे जाणारे क्षणभर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना ही नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना मी हळूच म्हणेन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील . . .
ती म्हणतील -
" बरं झालं इथे झाड आलं . . .
नाहीतर सगळा रखरखाटच होता !

याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही . . .
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .
आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता म्हणतील -
" बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्या वरती कोणी मी
राख राख बनताना
धूर सोडत हळूच म्हणेन
" बरं झालं मी झाड झालो . . .
अगदीच कुजुन मरण्यापेक्षा

- संदीप खरे

Sunday 22 May 2011

हळू हळू तिने मला


हळू हळू तिने मला
कुशीत खोल घेतले
निरांजनापरी मनात
शांत दीप लागले

अबोल रातराणी काय
बोलली व्यथासवे
हळू हळू हवेतले
सुगंध संथ सांडले

बंद बंद पाकळ्यात
मंद गंध कोंडले
कुणी तरी म्हणा आता
उजाडले उजाडले

मिटून चालली हळूच
अंतरात अंतरे
कुणी न हात लावताच
स्पर्श स्पर्श जाहले

बसायचे जरा
बघायचे तुला...अन परतुनी
निघायचे…
दिशा पल्याड
दूर कोणी थांबले

- संदीप खरे